सर्व समाधी विधीं मधील "कुलवधू" अर्थात शांभवी मुद्रा
लेखमालेच्या मागील भागात आपण घेरंड मुनींनी सांगितलेला पाचवा समाधी विधी अर्थात नादयोग समाधी जाणून घेतला. आता वेळ आहे ती शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या समाधी विधी बद्दल जाणून घेण्याची. खरंतर ह्या समाधी पद्धती विषयी मला भरभरून सांगण्याची इच्छा होती कारण मला शंभू महादेवाच्या कृपेने प्राप्त झालेल्या साधनांपैकी ही एक साधना आहे. मी इतरांना ध्यान शिकवताना हा विधी आवर्जून शिकवतो. परंतु वेळेची आणि शब्दांची मर्यादा लक्षात घेता या लेखात तसं करणं शक्य होणार नाही. त्यामुळे या लेखात मी फक्त घेरंड मताचंच निरुपण करणार आहे. सर्व ध्यान पद्धतींचा मुकुटमणी असलेला हा समाधी विधी म्हणजे -- शांभवी मुद्रा.
आजवर वेगवेगळ्या लेखांमधून आपण शांभवी मुद्रे विषयी जाणून घेतले आहे परंतु आज घेरंड मुनींच्या दृष्टीकोनातून शांभवी मुद्रेकडे आपण पहाणार आहोत. शांभवी शब्दाचा अर्थ होतो शंभूच्या मालकीची किंवा शंभूची किंवा शंभूने धारण केलेली. शांभवी शब्दाला कुंडलिनी योगाच्या दृष्टीकोनातून अजून एक अर्थ आहे. शंभूची शक्ती म्हणजे शांभवी. भगवान शंकराची अर्धांगिनी जगदंबा पार्वतीकडे गूढ निर्देश करणारा शब्द म्हणजे शांभवी. ब्रह्मदेवाची जशी ब्राह्मी, विष्णूची जशी वैष्णवी तशीच शंभूची शांभवी. पार्वती जशी शंकराची शक्ती स्वरूपा आहे तशीच शरीरस्थ शिवाची शक्ती म्हणजे जगदंबा कुंडलिनी.
शांभवी मुद्रेची थोरवी अशी कि स्वतः शंकर ती सदैव धारण करतो. भगवान शंकराच्या चित्रांमध्ये किंवा फोटोमध्ये तृतीय नेत्र अवश्य दाखवला जातो. तो तृतीय नेत्र म्हणजे महादेवाची शांभवी स्थिती. अगदी शिवलिंगावर सुद्धा तृतीय नेत्र भस्म-चंदन आदी गोष्टींनी दर्शवला जातो. ज्या विधीचा अवलंब करून भगवान शंकर स्वतः समाधी अवस्था प्राप्त करतो तो विधी म्हणजे शांभवी मुद्रा. ज्ञान चक्षु उघडणारी, वैराग्याचे प्राकट॒य करणारी मुद्रा म्हणजे शांभवी. आत्मासाक्षात्काराच्या प्रक्रियेतील एक महत्वाचा टप्पा म्हणजे शांभवी.
शांभवी मुद्रेचा विधी जाणून घेण्या आगोदर शांभवी मुद्रे द्वारे समाधी कशी साधायची त्या बद्दल घेरंड मुनी काय म्हणतात ते जाणून घेऊ --
शाम्भवीं मुद्रिकां कृत्वा आत्मप्रत्यक्षमानयेत् ।
बिन्दु ब्रह्ममयं दृष्ट्वा मनस्तत्र नियोजयेत् ॥
खमध्ये कुरु चात्मानमात्ममध्ये च खं कुरु ।
आत्मानं खमयं दृष्ट्वा न किञ्चिदपि बाधते ।
सदानन्दमयो भूत्वा समाधिस्थो भवेन्नरः ॥
वरील समाधी विधी नीट लक्षात घ्या. घेरंड मुनी म्हणतात की योग्याने प्रथम शांभवी मुद्रा करून आत्म्याचे प्रत्यक्षीकारण करावे. त्यानंतर बिंदू स्वरूप ब्रह्मतत्व दृष्टीगोचर करून त्या बिंदूमध्ये मनाला एकाग्र करावे. आकाशमय ब्रह्मात आत्म्याला आणि आत्म्यात आकाशमय ब्रह्म विलीन करावे. आत्मा आकाशमय ब्रह्म स्वरूप झाल्यावर अन्य काही दृष्टीगोचर होत नाही. योगी परमानंद स्वरूप होऊन समाधीत स्थिर होतो.
शांभवी मुद्रा तुम्हाला किती उच्च कोटीची अनुभूती देण्यास समर्थ आहे याची काहीशी कल्पना घेरंड मुनींच्या वरील विवेचनावरून येण्यासारखी आहे. नवीन साधकांचा असा एक गैरसमज असतो की आज्ञाचक्रावर ध्यान लावणे म्हणजे शांभवी मुद्रा. आज्ञाचक्रावर ध्यान ही केवळ एक क्रियात्मक सुरवात असते शांभवी मुद्रेची. ध्यान प्रगाढ होत होत अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर वरील अवस्था प्राप्त होते.
अजून एक गंमत लक्षात घ्या. पुस्तकी ज्ञान तुम्हाला असे वारंवार असे सांगेल की आत्मा हा काही डोळ्यांना प्रत्यक्ष दिसणारी गोष्ट नाही. मानवी शरीर-मनाचा सर्वसाधारण नियम असा की जी गोष्ट तुम्ही स्थूल नेत्रांनी पाहिलेली असते तीच गोष्ट तुम्ही मनाच्या डोळयांनी पाहू शकता. येथे घेरंड मुनी सांगत आहेत की आत्म्याचे प्रत्यक्षीकरण करावे अर्थात आत्म्याला प्रत्यक्ष पहावे. जर आजवर स्थूल डोळ्यांनी तुम्ही आत्मा पाहिलेलाच नाही तर मग मनाच्या डोळ्यांनी तुम्ही त्याला कसे काय बघणार? येथेच गुरुचा उपदेश आणि अनुभव कामी येतो. गुरु प्रदत्त साधना अनुसरली की मग हळू-हळू मनाच्या डोळ्याची ज्ञानकक्षा रुंदावायाला लागते. कूटस्थ आत्मा कसा असतो, तो खरोखर दिसतो का, दिसत असेल तर त्याला कसा पहावे वगैरे प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळायला लागतात.
आत्म्याला बिंदुमय ब्रह्मात विलीन करा असे वाचणे सोपे वाटते परंतु हे प्रत्यक्ष साधण्यासाठी अनेक वर्षांची भक्कम साधना असावी लागते. येथेच साधकाचे परिश्रम आणि कौशल्य पणास लागत असते. जोडीला गुरुकृपा आवश्यक असतेच. आजकाल शांभवी मुद्रेच्या नावाखाली फक्त आज्ञाचक्रावर ध्यान करायला शिकवले जाते. एक सुरवात म्हणून ते बरोबरच आहे परंतु पुढे काय? जर शिकवणारा स्वतः शांभवी मुद्रेत उच्च अवस्थेप्रत पोहोचलेला असेल तरच तो तुम्हाला पुढच्या वाटचालीचे मार्गदर्शन करू शकेल अन्यथा वर्षोनवर्षे तुम्ही फक्त आज्ञाचक्रावर ध्यान करण्याचा प्रयत्न करत बसाल. त्या पलीकडे फारसे काही हाती लागणार नाही.
आता शांभवी मुद्रेद्वारे समाधी स्थिती कशी प्राप्त करायची ते जाणून घेतल्यावर आता शांभवी मुद्रा कशी करायची ते जाणून घेऊ. घेरंड मुनी त्या बद्दल म्हणतात --
नेत्राञ्जनं समालोक्य आत्मारामं निरीक्षयेत् ।
सा भवेच्छाम्भवी मुद्रा सर्वतन्त्रेषु गोपिता ॥
बस्स. केवळ एका श्लोकात घेरंड मुनींनी शांभवी मुद्रा कशी करावी ते सांगून टाकले आहे. ते म्हणतात की भ्रूमध्यात दृष्टी स्थिर करून योग्याने आत्म्याचे निरीक्षण करावे अर्थात आत्म्याला पहावे. ते असेही म्हणतात की ही सर्व तंत्रशास्त्रात गोपनीय ठेवलेली शांभवी मुद्रा आहे.
घेरंड मुनींनी दिलेला शांभवी मुद्रेचा विधी अत्यंत त्रोटक असल्याने काही गोष्टींचे स्पष्टीकरण करणे आवश्यक आहे. शांभवी मुद्रेत भ्रूमध्यात मन एकाग्र केले जाते. वेगवेगळ्या परंपरांमध्ये या एकाग्रतेसाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जातात. या मार्गांमधील चार प्रकारचे मार्ग महत्वाचे आहेत --
सर्वसाधारणपणे शांभवी मुद्रेच्या हठयोगोक्त प्रकारात डोळ्यांची बुबुळे उलटी फिरवून किंवा दृष्टी उफराटी करून भ्रूमध्य प्रत्यक्ष पाहिला जातो. काही प्रकार भेदांत दृष्टी भ्रूमध्य स्थानी न ठेवता ती नासिकाग्रावर ठेवली जाते. अन्य प्रकारांत दृष्टी अर्धोन्मीलित ठेऊन "अलक्ष्य मुद्रा" धारण केली जाते. राजयोग किंवा ध्यानप्रधान मार्गावर प्रत्यक्ष डोळ्यांची बुबुळे भ्रूमध्य किंवा नासिकाग्रावर न ठेवता डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी भ्रूमध्य पाहिला जातो.
वरील शांभवी मुद्रेच्या प्रकारांपैकी तुम्हाला नक्की कोणता करणे आवश्यक आहे हे तुम्ही ज्या गुरुकडून ती शिकत आहात त्याच्यावर अवलंबून आहे. किंबहुना घेरंड मुनींनी कोणत्याही एका विधी विषयी आग्रह धरलेला नाही त्याचे कारणही हेच आहे. शांभवी ही समस्त तंत्रशास्त्रातील गोपनीय मुद्रा असल्याने प्रत्येकाने ती आपापल्या गुरुकडून किंवा एखाद्या जाणकाराकडून नीट शिकून घ्यावी हे उत्तम.
येथे घेरंड मुनी ज्या तंत्रशास्त्राची गोष्ट करत आहेत ते म्हणजे सर्वसामान्य लोकांना ठाऊक असलेले जारण-मारण इत्यादी परपीडात्मक विधीविधानाने भरलेले शास्त्र नव्हे. घेरंड मुनी निर्देश करत असलेले तंत्रशास्त्र म्हणजे कैलास पर्वतावर शंभू महादेवाने जगदंबा पार्वतीच्या कानात जे प्रकट केले ते अध्यात्म विज्ञान आहे.
आता मुळात शांभवी मुद्रेच्या बाबतीत एवढी गोपनीयता पाळण्याची गरजच काय? योगशास्त्रात एखाद्या गोष्टीविषयी साधारणतः तीन कारणांनी गोपनीयता पाळली जाते. एखादी योगक्रिया अत्यंत क्लिष्ट असेल तर ती शब्दांत व्यक्त करता येत नाही. अशावेळी गोपनीयता पाळून गुरुमुखातून ती ग्रहण करण्याची अपेक्षा असते. काही वेळा योगक्रिया ही चैतन्यस्वरूपात शिकवावी लागते. तरच ती पूर्ण फलदायी ठरते. उदाहरणार्थ, एखादा मंत्र देतांना तो मंत्रचैतन्यासहीत द्यावा लागतो. त्यासाठी प्रकट स्वरूपात ती क्रिया न देता गोपनीय प्रकारे दिली जाते. गोपनीयतेचे तिसरे कारण म्हणजे त्या क्रियेचा गैरवापर होण्याची शक्यता. काही मंत्र आणि योगक्रिया एवढ्या शक्तिशाली असतात की त्या सामान्य दर्जाचा साधक हाताळू शकत नाही. त्या क्रियांसाठी आवश्यक असलेले सामर्थ्य आणि नीतीनियम पाळण्याची तयारी त्याच्याकडे नसते. अशावेळी त्या क्रियेचा गैरवापर होण्याचा धोका असतो. स्वार्थासाठी या क्रिया वापरल्या जाऊ लागतात. दया, क्षमा, शांती, आत्मसंयम वगैरे योगसाधकासाठी आवश्यक असलेले गुण बाजूला ठेऊन सर्रास अध्यात्म शास्त्राचा स्वार्थासाठी वापर होऊ लागतो.
शांभवी मुद्रेला वरील तीनही गोपनीयतेचे निकष लागू पडतात. शांभवी वरकरणी वाटते तेवढी सोप्पी क्रिया नाही. एका विशिष्ठ स्तरावर पोहोचल्यावर ती क्लिष्ट आहे, काहीशी गुंतागुंतीची आहे. शांभवी ही चेतन स्वरूपात गुरुकडून किंवा जाणकाराकडून स्वीकारली तरच अधिक फायदेशीर ठरते. शांभवी ही सर्व ध्यानात्मक साधनांचा मुकुटमणी आहे. शांभवी मुद्रेमुळे एक अद्भुत सामर्थ्य योगसाधाकाच्या अंगी प्रकट होऊ लागते. जर तयारीचा साधक नसेल तर मग या सामर्थ्याचे जाहीर प्रदर्शन, प्रसंगी त्या सामर्थ्याचा गैरवापर शक्य आहे. त्यामुळे घेरंड मुनी ही योगशास्त्रांतर्गत गोपनीयतेची मर्यादा पाळत आहेत.
शांभवी मुद्रेची थोरवी गाण्यासाठी आणि ही थोरवी चंडकपालीवर ठसवण्यासाठी ते पुढे काय म्हणतात पहा --
वेदशास्त्रपुराणानि सामान्यगणिका इव ।
इयं तु शाम्भवी मुद्रा गुप्ता कुलवधूरिव ॥
घेरंड मुनी म्हणतात की वेद,शास्त्रे, पुराणे वगैरे पुस्तकी ज्ञान हे एखाद्या सामान्य गणिके समान आहे. या उलट शांभवी मुद्रा अत्यंत गोपनीय असून ती एखाद्या कुलवधू प्रमाणे आहे.
सर्वसाधारणपणे आपल्याला असे दिसते की समाजाच्या दृष्टीने एखाद्या गणिकेचे किंवा वेश्येचे स्थान हे नेहमीच कनिष्ठ दर्जाचे मानले जाते. या उलट एखाद्या कुलीन स्त्रीचे किंवा एखाद्या कुलवधूचे स्थान हे मानाचे आणि आदराचे असते. गणिका आणि कुलवधू यांच्यातील मान-सन्मानाचा हा जो प्रचंड फरक आहे त्याचा वापर घेरंड मुनींनी पुस्तकी ज्ञान आणि गुरुप्रदत्त शांभवी मुद्रेचे ज्ञान यांची तुलना करण्यासाठी केला आहे.
येथे एक गोष्ट आवर्जून सांगितली पाहिजे की वरील श्लोक जसाच्या तसा किंवा थोड्याफार फरकाने अनेक प्राचीन योग-आगम ग्रंथांत आलेला आहे. याचा अर्थ असा की घेरंड मुनींच्या आगोदर पासून हा श्लोक प्राचीन योग्यांच्या परंपरांमध्ये आणि योग साहित्यात प्रचलित आणि लोकप्रिय असला पाहिजे. जेंव्हा एखादा वाक्प्रचार किंवा म्हण किंवा काव्यपंक्ती लोकप्रिय होतात तेंव्हा त्यांचा सार्वत्रिक वापर केला जातो. त्यालाच अनुसरून घेरंड मुनी येथे हा प्रचलित श्लोक शांभवी मुद्रेची थोरवी अधोरेखित करण्यासाठी उधृत करत आहेत.
शांभवी मुद्रेची थोरवी सांगितल्यावर आता घेरंड मुनी आपल्याला शांभवी मुद्रेद्वारे समाधी साधलेल्या योग्याची स्थिती काय असते ते सांगत आहेत --
स एव आदिनाथश्च स च नारायणः स्वयम् ।
स च ब्रह्मा सृष्टिकारी यो मुद्रां वेत्ति शाम्भवीम् ॥
सत्यं सत्यं पुनः सत्यं सत्यमुक्तं महेश्वरः ।
शाम्भवीं यो विजानीयात्स च ब्रह्म न चाऽन्यथा ॥
तुम्हाला आठवत असेल की नादयोग समाधी विषयी सांगताना घेरंड मुनींनी आपल्याला सांगितले होते कि नादयोग समाधी साधलेला योगी विष्णू स्वरूप होतो. आता ते एक पाउल पुढे जाऊन सांगत आहेत की शांभवी मुद्रा समाधी साधलेला योगी स्वतः आदिनाथ, नारायण आणि ब्रह्मदेव होतो. अर्थात शांभव योगी ब्रह्मा-विष्णू-महेश स्वरूप बनतो.
हे वाक्य लिहिता लिहिता मला भगवान दत्तात्रेयांची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय रहावत नाही. त्या विषयी काही ओळी लिहिण्याचा मोह होत आहे पण तो आवरता घेतो. फारसे विषयांतर न करता पुढे जाऊ.
योग्याची "त्रिदेव" स्थिती अधोरेखित करण्यासाठी घेरंड मुनी सांगतात -- हे चंडकपाली! मी त्रिवार सत्य तेच सांगतो की जो योगी शांभवी मुद्रेचे विज्ञान जाणतो तो साक्षात ब्रह्म स्वरूप बनतो.
घेरंड मुनींनी कथन केलेले सहा समाधी विधी आपण जाणून घेतले. माझ्या लेखांमध्ये मी हे विधी वेगळ्या क्रमाने घेतले आहेत. त्यात शांभवी मुद्दामून शेवटी घेतला. जेणेकरून तुम्हाला शांभवीची अन्य समाधी विधींशी मनोमन तुलना करणे सोपे जावे. परंतु जर तुम्हाला आठवत असेल तर घेरंड मुनींनी जो समाधी विधींचा क्रम सांगितला होता त्यात शांभवी मुद्रा समाधी प्रथम स्थानावर आहे. याचा अर्थ घेरंड मुनी शांभवी मुद्रेला प्रधानता देत आहेत हे उघड आहे.
घेरंड मुनींनी सांगितलेले सहा समाधी विधी योग्याला ज्या अवस्थे पर्यंत घेऊन जातात ती अवस्था कोणती? ती अवस्था कशी असते? ती अवस्था प्राप्त झालेल्या योग्याचे पुढे काय होते? ते सर्व आता घेरंड मुनी सांगणार आहेत. पुढील लेखात आपण ते विस्ताराने जाणून घेणार आहोत.
असो.
शंभू आणि त्याची प्रिया शांभवी सर्व योगाभ्यासीना शांभवी मुद्रेचे यथार्थ ज्ञान प्राप्त करण्याची प्रेरणा देवोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.
हा लेख कॉपीराईट कायद्यांतर्गत सुरक्षित आहे. कृपया कोणत्याही प्रकारे पुनर्मुद्रित करू नये.
प्रिय वाचकांनो,
गेली अनेक वर्षे आम्ही आमच्या वेब साईटच्या माध्यमातून योग-अध्यात्म विषयक लेखन प्रसिद्ध करत आहोत.
आम्ही कोणालाही आमचे लेखन अन्यत्र पुनर्मुद्रित करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
तरीही काही लोकांनी आमचे लेखन अन्यत्र (उदा. फेसबुक पेज, व्हॉटस अॅप, ब्लॉग वगैरे) प्रकाशित केल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे.
मूळ लेखकाचे नाव आणि या वेब साईटचा दुवा देण्याचे सौजन्यही त्यांनी दाखविलेले नाही.
काहींनी तर आमचे लेखन आपल्या स्वतःच्या नावे प्रसिद्ध केले आहे.
या लोकांनी केलेले हे साहित्य चौर्य अर्थातच निंदनीय आणि खेदजनक आहे.
योग्य वेळ येताच भारतीय कायदा आपले कार्य करेलच परंतु आम्ही आमच्या सुजाण वाचकांना हे सूचित करू इच्छितो की त्यांनी अशा साहित्य चोरांपासून सावध रहावे. अशा लोकांशी आमचा कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. ही वेब साईट हे आमचे लेखन प्रसिद्ध होण्याचे एकमेव अधिकृत स्थान आहे.
आम्ही अन्य कोणालाही आमचे लेखन प्रसिद्ध करण्याची किंवा वापरण्याची परवानगी दिलेली नाही.
धन्यवाद.
~ वेब टीम
आपल्याला हा लेख आवडला असल्यास या लेखाची लिंक (URL) आपल्या मित्र परीवारा सोबत शेअर करण्यासाठी कृपया खालील सुविधेचा वापर करावा.