Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


भ्रामरी कुंभकाद्वारे नादब्रह्माची अनुभूती देणारी नादयोग समाधी

घेरंड मुनींनी सांगितलेल्या सहा समाधी प्रकारांपैकी चार प्रकार आपण जाणून घेतले आहेत -- भक्तियोग समाधी, मनोमूर्च्छा समाधी, रसानंद समाधी आणि लययोग समाधी. उरलेल्या दोन समाधी विधींपैकी नादयोग समाधी कशी साधायची ते आपण आज जाणून घेणार आहोत.

नादयोग समाधी या नावावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की या समाधी प्रकाराचा अनाहत नादांशी संबंध आहे. अनाहत नाद हा योगशास्त्रातील एक महत्वाचा विषय आहे. साधकाच्या आध्यात्मिक वाटचालीतील तो एक महत्वाचा टप्पा आहे. आपने यापूर्वीही अनेक वेळा अनाहत नाद आणि नादश्रवण यांविषयी जाणून घेतले आहे.

नादयोग समाधी कशी साधायची या विषयी ग्नेरंद मुनी म्हणतात --

अनिलं मन्दवेगेन भ्रामरीकुम्भकं चरेत् ।
मन्दं मन्दं रेचयेद्वायुं भृङ्गनादं ततो भवेत् ॥
अन्तःस्थं भ्रमरीनादं श्रुत्वा तत्र मनो नयेत् ।
समाधिर्जायते तत्र आनन्दः सोऽहमित्यतः ॥

याचा अर्थ असा की योग्याने भ्रामरी कुंभक करून मंद मंद अशा पद्धतीने रेचक करावा अर्थात श्वास बाहेर सोडावा. हे करत असतांना अंतरंगात जो भ्रमर गुंजना सारखा आवाज होतो त्यावर मन केंद्रित करावे. असे केल्याने "सोहं" बोध घडून येतो आणि योगी समाधीचा आनंद उपभोगू शकतो.

वरील विचेचना वरून हे स्पह्स्त आहे की या समाधी विधी मध्ये भ्रामरी कुंभकाचा वापर केला जातो. आता हा भ्रामरी कुंभक कसा करायचा? घेरंड मुनींनीच अन्यत्र त्याचा विधी सांगितला आहे. ते म्हणतात --

अर्धरात्रे गते योगी जन्तूनां शब्दवर्जिते ।
कर्णौ पिधाय हस्ताभ्यां कुर्यात्पूरककुम्भकम् ॥
श‍ृणुयाद्दक्षिणे कर्णे नादमन्तर्गतं शुभम् ।

मध्यरात्री जेथे कोणत्याही जीवमात्रांचा आवाज होत नसेल अशा ठिकाणी योग्याने आसनस्थ व्हावे. त्यानंतर दोन्ही हातांनी आपले कान झाकून पूरक आणि रेचकाचा अभ्यास करावा. हा अभ्यास करत असताना उजव्या कानात उमटणारे किंवा ऐकायला येणारे अंतर्नाद श्रवण करावेत.

प्रथमं ज़िंज़ीनादं च वंशीनादं ततः परम् ॥
मेघज़र्ज़रभ्रामरी घण्टाकांस्यं ततः परम् ।
तुरीभेरीमृदङ्गादिनिनादानकदुन्दुभिः ॥
एवं नानाविधो नादो जायते नित्यमभ्यसात् ।
अनाहतस्य शब्दस्य तस्य शब्दस्य यो ध्वनिः ॥

आता घेरंड मुनी वरील अभ्यास करत असताना कशा प्रकारे उत्तरोत्तर प्रगती होते सांगतात. प्रथमतः जिंजीनाद ऐकू येतो. मग क्रमाक्रमाने वंशीनाद, मेघनाद, जर्जरीनाद, भ्रमरनाद, घंटानाद, भेरी, मृदुंग, नगारा वगैरे वगैरे दशविध नाद ऐकू येतात. वेगवेगळ्या योगग्रंथांमध्ये या नादांची नावे आणि क्रम यांत अल्पसा भेद आढळतो. परंतु त्यांमागील सूत्र तेच आहे -- अनाहत नादाची उत्पत्ती आणि जो काही अनाहत नाद ऐकू येत आहे त्यावर ध्यानधारणा. नियमित अभ्यासाने हे नाद अनाहत चक्रात प्रकट होतात.

ध्वनेरन्तर्गतं ज्योतिर्ज्योतिरन्तर्गतं मनः ।
तन्मनो विलयं याति तद्विष्णोः परमं पदम् ।
एवं भ्रामरीसंसिद्धिः समाधिसिद्धिमाप्नुयात् ॥

आता घेरंड मुनी एक सूक्ष्म गोष्ट सांगत आहेत. ते म्हणतात -- या अनाहत ध्वनींच्या आत एक ज्योती विद्यमान आहे. त्या ज्योतीमध्ये मनाचा विलय केल्यावर विष्णूचे परमपद प्राप्त होते अर्थात योगी जणू विष्णुपदी लीन होतो. अशा प्रकारे भ्रामरी कुंभक सिद्ध होतो आणि एकदा का भ्रामरी कुंभक सिद्ध झाला की समाधी सिद्ध होते. येथे एक लक्षात घ्या की प्रत्यक्ष भ्रामरी कुंभकात किंवा नादश्रावणाच्या प्रक्रियेत कोणतेही ब्रह्मा, विष्णू, महेश वगैरे असे कोणतेही देवतेचे प्रतिक नाही परंतु मनाची उच्चावस्था अधोरेखित करण्यासाठी घेरंड मुनींनी विष्णुपदाचा उल्लेख केला आहे.

भ्रामरी कुंभकाचा आणि नादश्रवणाचा हा अभ्यास ज्यांनी ज्यांनी केला आहे त्यांना तो किती आनंददायक असतो त्याची अनुभूती नक्की आलेली असणार. अद्भुत असा हा समाधी विधी आहे. सुरवातीला हातांनी कान झाकताना अथवा षण्मुखी मुद्रा धारण करत असतांना त्रास होतो, हात दुखतात परंतु एकदा का अनाहत नाद ऐकू येऊ लागले की मग घेतलेल्या सर्व कष्टाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.

असो.

अनाहत नादाचे मूळ आहे जगदंबा कुंडलिनी. चेतना शक्तीच दशविध नादांच्या रूपाने प्रकट होत असते. मुलाधारातील स्वयंभू लिंगावर पहुडलेली महामाया भूजांगी सर्व योगाभ्यासीना सहाय्य करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 25 September 2023