Advanced Ajapa Dhyana Yoga : Tap the power of breath, mantra, mudra, and meditation for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


नाडीशोधन प्राणायामाचा गोपनीय विधी

नाडीशोधन प्राणायाम हा हठयोगातील एक प्रमुख प्राणायाम आहे. नाडीशोधनाची प्रारंभीक तयारी कोणती आणि ती कशी करायची ते गोरक्षनाथांनी आपल्याला आगोदार सांगितले आहे. आता पुढे जाऊन नाडीशोधनाची प्रत्यक्ष पद्धती जाणून घेण्याची वेळ आली आहे. ही विधी जरी गोरक्षनाथ महाराजांनी प्रकटपणे दिली असली तरी ही एका अर्थी "गोपणीयच" आहे कारण ह्या विधीचा अवलंब करणारे त्या मानाने कमी आहेत. विशेषतः यातील जो ध्यान धरण्याचा भाग आहे त्या प्रकाराला कित्येकजण पूर्णतः फाटा देतात आणि शारीरिक विधी तेवढा अंगिकारतात. योगामार्गाचे पारंपरिक ज्ञान ज्याला मिळाले आहे असा साधक अर्थातच हा विधी गुरुमुखातून जाणत असतात.

नाडीशोधन प्राणायाम करण्यासाठी पद्मासनात स्थानापन्न होऊन आपल्या श्रीगुरूंचे आणि भगवान शिवाचे स्मरण केल्यावर पुढे काय करायचे ते आता गोरक्षनाथ सांगत आहेत --

बद्धपद्मासनो योगी प्राणं चन्द्रेण पूरयेत् ।
धारयित्वा यथाशक्ति भूयः सूर्येण रेचयेत् ॥
अमृतोदधिसङ्काशं क्षीरोदधवलप्रभम् ।
ध्यात्वा चन्द्रमयं बिम्बं प्राणायामे सुखी भवेत् ॥

पद्मासनात बसून योग्याने चंद्र नाडीने / इडा नाडीने / डाव्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा अर्थात पूरक करावा. हे करत असतांना उजवी नाकपुडी अर्थातच बोटांनी बंद करावी लागेल. आत घेतलेला श्वास यथाशक्ती रोखून धरावा अर्थात कुंभक करावा. हे करत असतांना दोन्ही नाकापुड्या बोटांनी बंद करून घ्याव्या लागतील. त्यानंतर उजवी नाकपुडी उघडून सूर्य नाडीने अर्थात पिंगला नाडीने बाहेर सोडावा अर्थात रेचक करावा.

येथपर्यंत नाडीशोधन प्राणायामाचा विधी हा शारीरिक स्तरावरचा आहे. पुढील ध्यान विधी महत्वाचा आहे. हा विधी करत असतांना मनात चंद्रबिंबाचे ध्यान करावे. हे चंद्रबिंब कसे आहे तर पौर्णिमेच्या पूर्ण चंद्रा प्रमाणे अमृत सागरा प्रमाणे किंवा दुधाच्या समुद्रा प्रमाणे आहे. या शिवाय असे ध्यान करत असतांना मनातल्या मनात सुखाची, आनंदाची भावना ठेवायची आहे.

प्राणं सूर्येण चाकृष्य पूरयेदुदरं शनैः ।
कुम्भयित्वा विधानेन भूयश्चन्द्रेण रेचयेत् ॥
प्रज्वलज्ज्वलन ज्वाला पुञ्जमादित्यमण्डलम् ।
ध्यात्वा नाभिस्थितं योगी प्राणायामे सुखी भवेत् ॥

त्यानंतर सूर्य नाडी / पिंगला नाडी / उजव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर यथाशक्ति कुंभक करून चंद्र नाडीने श्वास बाहेर सोडायचा आहे. हे करत असतांना प्रज्वलित, ज्वालायुक्त अशा सूर्य मंडलाचे ध्यान करायचे आहे. हे ध्यान कुठे करायचे आहे तर नाभीच्या स्थानी. असे करत असतांना सुद्धा आधी प्रमाणे मनातल्या मनात सुखाची, आनंदाची भावना ठेवायची आहे.

येथे गोरक्षनाथांनी सूर्यमंडलाचे ध्यान शरीरात कोठे करावे ते सांगितले आहे परंतु चंद्रबिंबाचे ध्यान करत असतांना ते कुठे करायचे ते मात्र सांगितलेले नाही. हे चंद्रबिंबाचे ध्यान करायचे असते मस्तक / टाळू / कपाल अथवा सहस्रार प्रदेशात. गोरक्ष शतक काय किंवा कोणताही प्राचीन ग्रंथ हा आपापल्या श्रीगुरूंच्या सहायाने समजावून घ्यायचा असतो. अशा छोट्या-छोट्या निसटलेल्या पण साधनेच्या दृष्टीने महत्वाच्या गोष्टींसाठीच गुरुची गरज असते.

रेचकः पूरकश्चैव कुम्भकः प्रणवात्मकः ।
प्राणायामो भवेत्त्रेधा मात्रा द्वादशसंयुतः ॥
द्वादशाधमके मात्रा मध्यमे द्विगुणास्ततः ।
उत्तमे त्रिगुणा मात्राः प्राणायामस्य निर्णयः ॥

प्राणायामाचा संक्षिप्त विधी सांगितल्यावर गोरक्षनाथ आता त्यातील प्रगतीचे स्तर सांगत आहेत. प्रथम ते सांगतात की पूरक, रेचक आणि कुंभक हे प्रणव मंत्रासहित असायला हवेत. हे तीन मिळून बारा मात्रांचा प्राणायाम होतो. येथे खरंतर विस्ताराने या मात्रा गणने बद्दल काही सांगण्याची इच्छा होत आहे परंतु विस्तारभयास्तव हात आखडता घेणे गरजेचे आहे.

बारा मात्रांचा प्राणायाम हा अधम किंवा कनिष्ठ प्रकारचा मानला जातो. त्याच्या दुप्पट म्हणजे चोवीस मात्रांचा प्राणायाम हा मध्यम प्रकारचा मानला जातो. तिप्पट अर्थात छत्तीस मात्रांचा प्राणायाम उत्तम मानला जातो.

वरील तीन स्तराच्या प्राणायामाने जी शारीरिक लक्षणे प्रकट होतात ती आता सांगतात --

अधमे च घनो घर्मः कम्पो भवति मध्यमे ।
उत्तिष्ठत्युत्तमे योगी बद्धपद्मासनो मुहुः ॥

अधम स्तरावरील प्राणायामाने अतिशय घाम येतो. मध्यम प्रकारच्या प्राणायामाने शरीरात कंपने जाणवतात. उत्तम प्रकारच्या प्राणायामाने योगी बद्धपद्मासनात असून देखील वर उठतो / उडतो. येथे योगी वर उठतो किंवा उडतो हे विधान शब्दशः घ्यायचे नाही. वर उठतो याचा अर्थ प्राणशक्तीची दिशा ऊर्ध्वगामी बनून प्राण अत्यंत वेगाने वर उसळी मारतो. शरीर जणू तरंगते आहे की काय किंवा जमिनीपासून वर उचलले गेले आहे की काय अशी मानसिक भावना येते.

नाडीशोधन प्राणायामंचे विधीविधान सांगितल्यावर प्राणायामाशी संबंधित काही गोष्टी आता गोरक्ष मुनी आपल्याला सांगणार आहेत. त्यांच्याच कृपेने मी तुम्हाला त्या विषद करून सांगीन.

असो.

चंद्र नाडी आणि सूर्य नाडी यांना चालवणारी जगदंबा पराशक्ती कुंडलिनी समस्त योग साधकांना प्राणायाम तत्पर करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे तीस वर्षांपेक्षा अधिक काळ भगवान शिव प्रणीत योग विद्येचे आणि अजपा गायत्रीचे उपासक आणि मार्गदर्शक आहेत. व्यवसायाने सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक आणि लेखक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. त्यांच्या अजपा ध्यान योगाच्या ऑनलाईन सेशन्स विषयीची अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 24 March 2025