Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


खेचरी मुद्रेतील योगगम्य रसग्रहण अर्थात रसनानंद समाधी

घेरंड मुनींनी वर्णन केलेल्या सहा समाधी प्रकारांपैकी योनिमुद्रा समाधी आपण मागील लेखात जाणून घेतली आहे. या लेखात आपण खेचरी मुद्रा समाधी अर्थात रसनानंद समाधी विषयी काही जाणून घेणार आहोत.

घेरंड मुनींनी विषद केलेल्या समाधी विधींपैकी सर्वच विधी अंतिम अवस्थेच्या दृष्टीने पहायला गेलं तर कठीण आणि दुर्लभ आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि अंततः समाधी असा हा बिकट आणि खडतर प्रवास कोणत्याही समाधी विधीसाठी करावाच लागतो. असे असले तरी क्रियात्मक दृष्ट्या एक विधी किंवा technique म्हणून खेचरी मुद्रा समाधी सर्वात जास्त किचकट आणि क्लिष्ट आहे.

घेरंड मुनींनी खेचरी मुद्रा समाधीला रसनानंद समाधी असे म्हटले आहे कारण यात जिभेचा किंवा रसनेचा उपयोग करून प्रथम खेचरी मुद्रा साधली जाते. जिभ हे एक ज्ञानेंद्रीय आहे. जिभेचे कार्य आहे पदार्थांच्या चवीचे किंवा रसांचे ज्ञान करून देणे. रसनेच्या याच कार्याचा वापर खेचरी मुद्रा समाधीमध्ये केला जातो.

रसनानंद समाधी विषयी सांगतांना घेरंड मुनी म्हणतात --

खेचरीमुद्रासाधनाद्रसनोर्ध्वगता यदा ।
तदा समाधिसिद्धिः स्याद्धित्वा साधारणक्रियाम्

खेचरी मुद्रा धारण करून रसना अर्थात जीभ ऊर्ध्व स्थितीत ठेवावी. असे केल्याने साधारण शारीरिक क्रियांचा विसर पडून समाधी सिद्धी लाभते.

घेरंड मुनींनी दिलेले हे विवरण अर्थातच अत्यंत त्रोटक आहे. खाच्री मुद्रा कशी करायची याविषयी अन्यत्र ते म्हणतात --

जिह्वाऽधो नाडीं सञ्चिन्नां रसनां चालयेत्सदा ।
दोहयेन्नवनीतेन लौहयन्त्रेण कर्षयेत् ॥
एवं नित्यं समभ्यासाल्लम्बिका दीर्घतां व्रजेत् ।
यावद्गच्छेद्भ्रुवोर्मध्ये तदा गच्छति खेचरी ॥
रसनां तालुमध्ये तु शनैः शनैः प्रवेशयेत् ।
कपालकुहरे जिह्वा प्रविष्टा विपरीतगा ।
भ्रुवोर्मध्ये गता दृष्टिर्मुद्रा भवति खेचरी ॥

जिभेच्या खाली जीभ खालच्या जबड्याला जोडणारी नाडी असते. त्या नाडीचे रोज अगदी कणाकणाने धारधार शस्त्राने छेदन केले जाते. त्याच बरोबर जीभ पुढच्या दिशेला खेचण्याचा किंवा दोहन करण्याचा अभ्यास केला जातो. असे दीर्घकाळ केल्यानंतर जिभेची लांबी वाढते. जिभेची लांबी कुठपर्यंत वाढवावी? जीभ जोवर भृमध्यापर्यंत अर्थात दोन भुवयांच्या मधील भागापर्यंत पोहोचत नाही तोवर ही छेदनाची आणि दोहनाची प्रक्रिया करावी. जीभ वरील प्रमाणे लांब केली की मग तिला हळूहळू उलट दिशेला फिरवून अर्थात जिभेचे टोक घशाकडे फिरवून टाळूमध्ये किंवा कपाल कुहरात घुसवावी. त्यानंतर दृष्टी दोन भुवयांच्या मध्ये ठेवावी. असे केल्याने जी मुद्रा होते तिला खेचरी म्हणतात.

खेचरी मुद्रेचा विधी किती क्लिष्ट आणि काहीसा धोकादायक आहे ते बघा. जर जिभेची नाडी कापतांना थोडी जरी चूक झाली तरी जिभेवर आणि परिणामी बोलण्याच्या शक्तीवर दुष्परिणाम होऊ शकतो. दुसरे असे की वरील विवेचनात जिभेची जी लांबी दर्शविली आहे -- मुखापासून ते भूमध्यापर्यंत -- ती व्यावहारिक वाटत नाही. त्यामुळे ही लांबी शब्दशः न घेता ती लक्ष्यार्थाने घ्यायला हवी अन्यथा फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यताच अधिक.

खेचरी मुद्रा साधण्यासाठी बराच कालावधी लागू शकतो. खेचरी एकदा का साधू लागली कि तिचे फायदे अनुभवास येतात. खेचरी मुद्रेचे फायदे कोणते तर --

न च मूर्च्छा क्षुधा तृष्णा नैवाऽऽलस्यं प्रजायते ।
न च रोगो जरा मृत्युर्देवदेहः स जायते ॥
न चाग्निर्दहते गात्रं न शोषयति मारुतः ।
न देहं क्लेदयन्त्यापो दंशयेन्न भुजङ्गमः ॥
लावण्यं च भवेद्गात्रे समाधिर्जायते ध्रुवम् ।
कपालवक्त्रसंयोगे रसना रसमाप्नुयात् ॥
नानारससमुद्भूतमानन्दं च दिने दिने ।
आदौ लवणक्षारं च ततस्तिक्तकषायकम् ॥
नवनीतं घृतं क्षीरं दधितक्रमधूनि च ।
द्राक्षारसं च पीयूषं जायते रसनोदकम् ॥

ज्याला खेचरी मुद्रा साधली आहे त्याला मूर्च्छा, क्षुधा, तृष्णा, आळस इत्यादी विकार जाणवत नाहीत. रोग, वार्ध्यक्य आणि मृत्यू यांचे भय त्याला उरत नाही. त्याला अग्नी जाळू शकत नाही किंवा वायू सुकवू शकत नाही. जल त्याला भिजवू शकत नाही किंवा सर्प त्याला दंश करू शकत नाही. असा योगी रूप-लावण्याने परिपूर्ण होतो आणि त्याला समाधी साधू लागते. कपाल कुहर आणि जीभ यांचा संयोग झाल्याने जिभेवर नाना प्रकारच्या अद्भुत रसांची चव अनुभवास येते. सुरवातीला लवण, क्षार आणि त्यानंतर तिखट, कषाय, लोणी, तूप, दुध, दही, मध, द्राक्षरस, अमृत अशा विविध रसांची चव रसनेवर अनुभवास येते.

खेचरी मुद्रेचे वरील फायदे सुद्धा शब्दशः न घेता त्यांचा निर्देश कशाकडे आहे ते समजून घ्यायला हवेत. खेचरीचा सर्वात मोठा उपयोग म्हणते सहस्रार चक्रातून ठिबकणारे योगगम्य अमृत प्राशन करणे. हे अमृत प्राशन करता करता योगी समाधिस्त होतो.

या लेखाचा उद्देश घेरंड मुनींनी वर्णन केलेली खेचरी मुद्रा समाधी एवढाच असल्याने अवांतर गोष्टींविषयी फार काही लिहित नाही. खेचरी विद्या हि काहीशी विस्तृत शाखा आहे त्यामध्ये खेचरी मुद्रा, खेचरी मंत्र, खेचरी देवी, खेचरी विद्या आणि खेचरी अवस्था अशा अनेक सूक्ष्म गोष्टींचा समावेश होतो. घेरंड मुनींनी येथे फक्त खेचरी मुद्रेविषयी सांगितले आहे. खेचरी मुद्रे विषयीचा माझा व्यक्तिगत अनुभव मी मागे काही लेखांमधून सांगितला आहे (येथे आणि येथे वाचा). त्यामुळे येथे पुनरावृत्ती करत नाही.

आता खेचरी मुरे सारख्या क्लिष्ट विधीत शिरावे की नाही हा प्रत्येकाचा व्यक्तिगत विषय आहे. आपापली शारीरिक आणि मानसिक कुवत आणि गुरुचे मार्गदर्शन यांचा विचार करून त्याबाबत निर्णय घ्यावा हे उत्तम.

असो.

खेचरी अर्थात अवकाशात विचरण करणारी. तुर्येच्या आकाशात विहार करण्यासाठी शंभू महादेव सर्वांना सहाय्य करोत या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 28 August 2023