Advanced Ajapa Yoga Kriyas and Meditations : Tap the power of breath, mantra, mudra, and dhyana for improved focus, peace of mind, and blissful inner connection.


घेरंड मुनींचा ध्यान योग आणि समाधी योग -- उपसंहार

मागील वर्षी श्रीदत्त जयंतीच्या थोडे आधी म्हणजे साधारणपणे नोव्हेंबर २०२२ मध्ये घेरंड संहितेवर आधारित एक लेखमाला करावी असा विचार मनात आला. सुरवातीला फक्त घेरंड मुनींच्या ध्यान पद्धतीचे धावते विश्लेषण करावे असा विचार होता. परंतु विषयाला हात घातल्यावर पसारा वाढला. वाचकांच्या काही प्रश्नांनी आणि लेखमाला आवडत असल्याच्या अभिप्रायांनी त्यात अधिकच भर घातली गेली. असे करता करता आज एका वर्षानंतर ह्या लेखमालेला आता पूर्णविराम देण्याची वेळ येऊन ठेपली आहे. हा "उपसंहार" धरून एकोणीस लेख या लेखमालेत झाले आहेत.

भगवान शंकराने प्रदान केलेला कुंडलिनी योग चार प्रकारांत विभागलेला आहे -- मंत्रयोग, हठयोग, लययोग आणि राजयोग. घेरंड संहिता हा घेरंड मुनी आणि चंडकपाली यांच्यातील संवाद रूपाने रचलेला ग्रंथ हा प्रामुख्याने हठयोगावरील ग्रंथ मानला जातो. हठयोग पद्धती मधील महत्वाचे घटक जसे आसने, प्राणायाम, बंध, मुद्रा वगैरे यांचे विवेचन या ग्रंथात आलेले आहे. परंतु त्याच बरोबर ध्यानयोगाचे विस्तृत विवेचन हे या ग्रंथाचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. हठयोग प्रदिपिके सारख्या अन्य हठ ग्रंथांत ध्यान योग काहीसा त्रोटक स्वरूपात हाताळता आहे. घेरंड मुनींनी मात्र आपल्या हठयोग ग्रंथांत ध्यानयोगाचा विषयही विस्ताराने हाताळता आहे.

घेरंड मुनींच्या ध्यानयोगाचे ढोबळमानाने दोन भाग आहेत -- ध्यान आणि समाधी. या दोन भागांचा अवलंब करून आत्मसाक्षात्कार आणि मुक्ती प्राप्त करायची अशी शिकवण ते देतात. आत्मसाक्षात्कार ही मानवी जीवनातील सर्वात दुर्लभ गोष्ट म्हणावी लागेल. ऋषी-मुनी-योगी-तपस्वी यांनी आपले उभे आयुष्य ज्या साठी वेचले ती आत्मानुभूती अमुल्य आहे हे उघडच आहे.

आजच्या आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलीमुळे आजच्या योग साधकांना सगळ्या गोष्टी मोबाईलचा स्क्रीन टॅप करावा तेवढ्या पटकन आणि सहजपणे घडाव्यात असे वाटत असते. आत्मसाक्षात्कारा सारखी अमुल्य आणि दुर्लभ गोष्ट काही त्या प्रकारे मिळणारी नाही. त्यासाठी श्रद्धा-सबुरी-शिस्त-समर्पण या चतुःसुत्रीचाच अवलंब करणे भाग आहे.

ज्याला भूक लागली आहे त्याने स्वतःच अन्न ग्रहण करणे आवश्यक आहे. ज्याला निद्रा येत आहे त्याने स्वतःच निद्रा घेणे आवश्यक आहे. दुसऱ्या कोणीतरी अन्नग्रहण करून किंवा निद्रा घेऊन काही उपयोग नाही. दुसरा व्यक्ती तुमच्यापुढे फारतर अन्नाचे ताट आणून ठेवेल किंवा तुम्हाला शयनकक्षात घेऊन जाईल पण अन्नग्रहण किंवा शयन हे तुमचे तुम्हालाच करावे लागेल. ज्याला आत्मसाक्षात्काराची तळमळ लागली आहे अशा मुमुक्षु साधकाला त्यासाठी स्वतःच प्रयत्नरत होणे आवश्यक आहे. कितीही चांगल्या गुरुचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले तरी शेवटी योगमार्गावरून वाटचाल ही ज्याची त्यालाच करावी लागले. त्याला अन्य उपाय नाही.

कल्पना करा. घेरंड मुनी चंडकपालीला कुंडलिनी योगाचे ज्ञान देत आहेत. ते स्वतः या मार्गावरचे अत्यंत उच्च कोटीचे साक्षात्कारी गुरु आहेत हे त्यांच्या शिकवणीवरून स्पष्टच आहे. असे असूनही ते चंडकपालीला योग प्रत्यक्ष आचरण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. घेरंड मुनींनी चंडकपालीच्या डोक्यावर हात ठेवला आणि चंडकपाली काहीही न करता तत्काळ समाधिस्त झाला किंवा साक्षात्कारी झाला किंवा मुक्त झाला असा प्रकार नाही. तात्पर्य हे की योगमार्ग हा पुरुषार्थ प्रधान मार्ग आहे. काहीतरी चमत्कार घडून आपण फारसे कष्ट न करता साक्षात्कारी होऊ अशी मानसिकता असलेल्या लोकांसाठी योगमार्ग बिलकुल नाही. योगमार्ग हा आनंदाचा आणि अनंताचा एक अद्भुत प्रवास आहे. शंभू महादेव आजही या मार्गावर एक प्रवासी बनून योग आचरत आहेत जेणेकरून इतरांसमोर आदर्श उभा रहावा आणि इतरांना याची सदैव आठवण रहावी -- जिये मार्गीचा कापडी । महेशु आझुनी ।। (ज्ञानेश्वरी)

कदाचित तुम्हाला असे वाटेल की मी योगमार्गाचा कठीण चढ वारंवार अधोरेखित करतो आहे. तसे करणे आवश्यक आहे कारण आजकाल लोकांनी योगमार्ग हा अतिशय भेसळयुक्त आणि अतिसुलभ करून टाकला आहे. परंतु सर्वसामान्य मनःशांती साठी करण्याची ध्यान-धारणा आणि कुंडलिनी जागृतीद्वारे आत्मसाक्षात्कारासाठी असलेला समाधी योग यात बरेच अंतर आहे. मी स्वतः गेली अनेक वर्षे या मार्गावरून वाटचाल केलेली आहे. या मार्गातील खाचखळगे आणि चढउतार यांची मला पूर्ण कल्पना आहे. योगमार्गा विषयी नुसत्या लंब्याचौड्या बाता करून किंवा टोलेजंग दावे करून काहीतरी भ्रामक चित्र रंगवण्याचा माझा स्वभाव नाही. माझ्या श्रीगुरुमंडलाच्या कृपेने लेखांतून शिव प्रदत्त योगमार्गाचे यथार्थ ज्ञान प्रस्तुत करण्याचा माझा नेहमीच यथाशक्ती आणि यथामती प्रयत्न राहिला आहे. त्यामुळे वाचकांनी बिचकून न जाता त्यामागील माझा उद्देश लक्षात घेतला पाहिजे.

तुम्ही सगळे सुज्ञ आणि जाणते वाचक आहात. जेंव्हा तुम्हाला योगमार्ग वाटतो तेवढा सोप्पा नाही याची जाणीव होईल तेंव्हा तुम्ही त्याकडे अधिक प्रगल्भतेने आणि सखोलपणे पाहाल. कठीण वाटचाल सुखकर कशी करता येईल किंवा शक्य तेवढी सोपी कशी करता येईल याकडे तुम्ही लक्ष देऊ लागाल. प्रामाणिकपणे स्वतःला या मार्गावरील वाटचालीसाठी तयार कराल. तुमच्या आध्यात्मिक आयुष्याचे शॉर्ट टर्म प्लानिंग न करता लॉंग टर्म प्लानिंग कराल. हे सगळं करत असतांना खालील गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्या असे मी सांगीन --

१. तुमची ध्यान पद्धतीची आणि संलग्न साधनांची निवड अचूक असू दे. योगमार्गावर असंख्य ध्यानाच्या पद्धती आहेत. त्यांतील तुमच्या शरीर-मनाला कोणती लागू पडेल ते नीट पहा. अस्सल भारतीय परंपरागत योगसाधना काळाच्या कसोटीवर उतरलेल्या आहेत. आजवर असंख्य ऋषी, मुनी, योगी, तपस्वी लोकांनी त्यंचा अवलंब केलेला आहे. इंटरनेटवर उपलब्ध सगळ्याच गोष्टी काही शास्त्रशुद्ध आणि शास्त्रसंमत असत नाहीत. चकाकणाऱ्या सगळ्याच गोष्टी सोने नसतात हे नेहमी लक्षात ठेवा. एखादी ध्यानाची पद्धत पूर्णतः स्वीकारण्यापूर्वी शक्य असल्यास काही दिवस तरी तिचा प्राथमिक अभ्यास करून पहा. त्या पद्धतीची सविस्तर माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही निवडलेल्या ध्यान पद्धतीतील कोणी जाणकार परिचयाचे असतील तर त्यांच्याशी बोलून शंका निरसन करण्याचा प्रयत्न करा. ध्यानाच्या कोणत्याही पद्धतीत मनातील विचार कमी करणे आणि एकाग्रता हे महत्वाचे घटक असले तरी प्रत्यक्ष विधी-विधानाच्या बाबतीत बराच फरक असतो. उदाहरणार्थ, घेरंड मुनींनी सांगितलेली भक्तीयोग समाधी आणि रसनानंद समाधी यांत क्रियात्मक दृष्टीने बराच फरक आहे. त्यांचे अंतिम उद्दिष्ठ एकच पण विधी-विधान मात्र कमालीचे भिन्न. त्यामुळे सर्व ध्यान पद्धती सारख्याच नसतात हे लक्षात घ्या आणि योग्य ती पद्धत निवडा.

२. एखाद्या गुरुचे किंवा जाणकाराचे मार्गदर्शन घ्यायला बिलकुल लाजू नका. योग-अध्यात्म मार्गावर काही साधकांना दुसऱ्याकडून ध्यान वगैरे शिकायला लाज वाटते किंवा कमीपणाचे वाटते. ज्ञान तर हवे असते पण गुरु नको असतो. कुठेतरी अहंकार आड येत असतो. पोहायचे कसे हे पुस्तकात वाचून कळत नाही. त्यासाठी पोहायला येणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून धडे घेणे जास्त फायद्याचे ठरते. मला अशी मंडळी नेहमी आढळतात की ज्यांनी ध्यानमार्गाची कास धरून दहा, पंधरा, वीस वर्षे उलटून गेली आहेत पण मनःशांती पलीकडे त्यांची आध्यात्मिक प्रगती काही झालेली नाही. एखाद्या जाणकार व्यक्तीचे मार्गदर्शन त्यांनी साधनेच्या सुरवातीलाच घेतले असते तर त्यांचा एवढा वेळ वाया गेला नसता. तुम्हाला जर कोणत्याही गुरु किंवा मार्गदर्शका शिवाय वाटचाल करायची असेल तर तसाही प्रयत्न करून बघायला हरकत नाही. परंतु त्यासाठी काहीतरी कालमर्यादा निश्चित करा. वर्षांमागून वर्षे सरत आहेत आणि तुम्ही जेथे होतात तेथेच आहात असे होता कामा नये. ठरवलेल्या कालमर्यादेत काहीच यश मिळाले नाही तर मात्र कोणाचा तरी सल्ला घ्यावा हे उत्तम.

३. तुमच्या गुरुशी अथवा मार्गदर्शकाशी जोडलेले रहा. कोणतीही ध्यान क्रिया शिकल्यावर ती पूर्णतः अवगत व्ह्यायला अनेक वर्षांचा कालावधी लागतो. ध्यान क्रिया टप्प्या-टप्प्याने उत्क्रांत होत आरंभ, घट, परिचय आणि निष्पत्ती अशा अवस्थांमधून जात असते. या प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शनाची आणि शंकानिरसनाची गरज भासू शकते. त्यासाठी ज्या व्यक्तीकडून तुम्ही ध्यान शिकला आहात त्याच्याशी जोडलेले राहणे महत्वाचे ठरते. आज बहुतेक ठिकाणी आध्यात्मिक ज्ञानाचे धडे हे मोठ्या ग्रूपला किंवा समूहाला एकत्रितपणे दिले जातात. त्यामुळे होतं काय की तुम्हाला ध्यान साधना नीट कळली आहे की नाही हे शिकवणाऱ्या व्यक्तीला कळत नाही आणि आपण ध्यान साधना अपेक्षित विधीनुसार करतोय की नाही हे तुम्हाला कळत नाही. कित्येकदा तर असं होतं की ध्यान साधनेचे सत्र संपल्यावर शिकवणाऱ्या व्यक्तीशी कधी संपर्कही करता येत नाही. दुसरं असं की आज इंटरनेटच्या मायाजालात एवढ्या ठिकाणांहून अध्यात्म ज्ञानाचे डोस मिळत असतात की साधना एकाची करायची, मंत्र दुसऱ्याच कडून घ्यायचा, प्रवचन तिसऱ्याचे ऐकायचे, पुस्तके चौथ्याची वाचायची, गुरु म्हणून अजून वेगळ्याच संत-सत्पुरुषाला मानायचे अशी काहीशी विचित्र सरमिसळ सर्रास घडतांना दिसत आहे. अशा साधकांची भक्ती सुद्धा मग "अव्यभिचारी" न रहाता "एक ना धड अन भाराभर चिंध्या" अशी विखुरलेली बनते. मनाच्या समाधानासाठी पुस्तकी ज्ञान जरी भरपूर गोळा झाले असले तरी हाती ठोस असे काहीच लागत नाही.

४. मंत्रयोग, हठयोग आणि लययोग सुद्धा महत्वाचे आहेत. ध्यान किंवा समाधी हा प्रामुख्याने राजयोगाचा विषय आहे. ध्यानयोगात रस असणारे साधक कित्येकदा फक्त ध्यानाकडेच लक्ष देतात. नाडीशुद्धी, तत्वशुद्धी, मंत्रचैतन्य, स्पंदशास्त्र, शिवस्वरोदय, आयुर्वेदातील त्रिदोष वगैरे गोष्टींकडे त्यांचे दुर्लक्ष होते. अशा मंडळींन अनेकदा ध्यानात भास होतात, कुंडलिनी कोणत्यातरी खालच्या चक्रावर अडकून पडते, ध्यानात भय, भ्रम, मित्थ्या ज्ञान असे दोष निर्माण होतात. शंभू महादेवाने मंत्र-हठ-लय-राज अशा टप्प्यांनी योगमार्गाची आखणी केलेली आहे. त्या-त्या मार्गाचे काही उद्दिष्ठ आणि महत्व आहे. ते टाळून पुढे जाता येणार नाही. त्यामुळे ध्यान शिकत असतांना सर्वंकष योगमार्गाचा विचार करायला हवा. तुम्ही स्वतः जरी या चारही मार्गांवरील साधना पृथक-पृथक स्वरूपात केल्या नसल्यात तरी तुम्ही ज्या व्यक्तीकडून ध्यान शिकत आहात त्याला योगमार्गाचे सर्वंकष ज्ञान असेल तरच तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल.

५. ध्यान म्हणजे काय नाही ते ही नीट समजून घ्या. आजकाल ध्यान किंवा मेडीटेशन ही एवढी सामान्य आणि भेसळयुक्त गोष्ट बनली आहे की ध्यान म्हणजे काय आहे आणि ध्यान म्हणजे काय नाही हे दोन्ही तुम्हाला नीट माहित असायला हवे. विशेषतः पाश्चात्य लोकांच्या प्रभावाखाली आलेल्या ध्यान पद्धती इतक्या चित्रविचित्र आहेत की वर्षोनवर्षे तसे ध्यान केले तरी समाधी लाभासाठी त्याचा ढिम्म काही उपयोग होणारा नाही. ध्यान म्हणजे काय ते प्राचीन योगग्रंथांत बऱ्यापैकी विस्ताराने आलेले आहे. घेरंड मुनी त्या विषयी काय म्हणतात ते आपण विस्ताराने जाणून घेतलेच आहे. त्यामुळे येथे पटकन ध्यान म्हणजे काय नाही ते थोडक्यात जाणून घेऊ. डोळे बंद करून मनाच्या "स्क्रीन" वरती काल्पनिक चलचित्र पहाणे म्हणजे ध्यान नाही. एखाद्या बाह्य वस्तूवर नेत्र एकाग्र करून त्राटक करणे म्हणजे ध्यान नव्हे. मनातल्या मनात स्वतःला स्वयंसूचना देणे म्हणजे ध्यान नाही. शांत बसून मनःशांती किंवा शिथिलता देणारे संगीत / स्तोत्र / मंत्र ऐकणे म्हणजे ध्यान नाही. आडवे झोपून योगनिद्रा घेणे म्हणजे ध्यान नाही. प्राणिक हिलिंग किंवा तत्सम उपचार पद्धती म्हणजे ध्यान नव्हे. वरील यादी वाचल्यावर तुम्हाला कदाचित खूप आश्चर्य वाटेल कारण ध्यानाच्या नावाखाली बऱ्याचदा याच गोष्टी शिकवल्या जातात. वरील गोष्टी काही वाईट आहेत असं बिलकुल नाही पण घेरंड मुनींना अपेक्षित असलेला समाधी योग किंवा आत्मसाक्षात्कार त्यांनी साधणारा नाही. या गोष्टींचा मनःशांती आणि आरोग्यासाठी उपयोग होईलही कदाचित पण त्या पलीकडे जाऊन घेरंड मुनींना अभिप्रेत असलेल्या मोक्षप्राप्ती साठी त्यांचा फारसा उपयोग होणार नाही.

असो. मला वाटतं तुम्हाला एकूण विषयाचा आवाका आणि वाटचाल करतांना घ्यायची काळजी याची थोडीतरी कल्पना आली असेल. माझी लेखणी आता आवरती घेतो. तुमच्या सोयीसाठी या लेखमालेतील सर्व लेखांच्या लिंक्स एकत्रितपणे खाली देत आहे.


घेरंड मुनींचा ध्यानयोग - पार्श्वभूमी आणि परिचय

घेरंड मुनींनी विषद केलेले ध्यानाचे तीन प्रकार

स्थूल ध्यानाचा पहिला प्रकार

स्थूल ध्यानाचा दुसरा प्रकार

योगजीवनातील काही मुलभूत धडे

मूलाधार, मणिपूर आणि आज्ञा चक्रांतील तेजोध्यान अथवा ज्योतीर्ध्यान

शांभवी मुद्रेद्वारे कुंडलिनी शक्तीचे सूक्ष्म ध्यान

निर्वाण षटक अर्थात शिवस्वरूप आत्मतत्वाची अनुभूती

समाधी प्राप्तीसाठी गुरुकृपेची आणि गुरुभक्तीची आवश्यकता

परमात्म्याकडे नेणारे सहा समाधी मार्ग

अष्टसात्विक भाव दाटून भक्तियोग समाधीची प्राप्ती

कुंभकाद्वारे प्राप्त होणारी मनोमुर्च्छा समाधी

लयसिद्धी प्रदान करणारी परम गोपनीय योनिमुद्रा समाधी

खेचरी मुद्रेतील योगगम्य रसग्रहण अर्थात रसनानंद समाधी

भ्रामरी कुंभकाद्वारे नादब्रह्माची अनुभूती देणारी नादयोग समाधी

सर्व समाधी विधीं मधील "कुलवधू" अर्थात शांभवी मुद्रा

घेरंड मुनींच्या योग पद्धती मधील समाधी महात्म्य

समाधी साधना करत असतांना "या" गोष्टींची काळजी घ्या

घेरंड मुनींचा ध्यान योग आणि समाधी योग -- उपसंहार



असो.

सध्या दीपोत्सवाचे मंगलमय पर्व सुरु आहे. स्वयंप्रकाशित आत्म्याचा तेजोदीप तुम्हा सर्व वाचकांचे आयुष्य उजळून टाको, तुम्हास शाश्वत सुख प्रदान करो या सदिच्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 13 November 2023